वृषाली किरण
राजवस्त्र म्हणून ओळख असलेली आणि प्राचीन परंपरा असणारे वस्त्र म्हणजे पैठणी. नाजुक कलाकुसर आणि गर्भरेशमी रंगानी हातमागावर विणलेले हे वस्त्र. पैठणी आणि महाराष्ट्र असं समीकरण आहे. किबहुना प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात पैठणी ही असतेच. पैठणीशी असलेले नातं परंपरांनी आणि पिढ्यांन पिढ्यांनी जपलेलं. हीच पंरपरा सांभाळणारी नवी मुंबईतली होम मिनिस्टर म्हणजे सीवूडस येथे राहणा-या वृषाली किरण. मूळच्या रायगड जिल्हातल्या उरणच्या असणा-या वृषालीताईं महाराष्ट्राच्या पोशाख संस्कृतीत महत्वाचं स्थान पटकावणा-या पैठणीची परंपरा मनापासून सांभाळत आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पैठणी पोहोचावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मागील पंधरा वर्षांपासून त्या अस्सल पैठणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
वृषालीताई लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. काही कारणाने वृषालीताईंना त्यांचे इंग्रजी माध्यमातले शिक्षण सोडून मराठी माध्यमात शिक्षण घ्यावे लागलं. पाचवीपासून ग्रॅंट रोडच्या सेवा सदन शाळेमध्ये पुढील शिक्षणासाठी दाखल झाल्या. सातवी- आठवीत असताना महालक्ष्मीच्या मंदारातून तसेच काही धनदांडग्या व्यक्तिंकडून आश्रमातल्या मुलींसाठी साड्या यायच्या . त्या साड्य़ा वापरायल्या मिळायच्या. तेव्हाच साडी या प्रकाराबदद्ल कुतुहल निर्माण झालं. त्यावेळी आश्रमात साड्यांना इस्त्री कऱण्याचे काम होतं. या कामामुळे साड्या हाताळायला मिळाल्या. यामुळे साडीचा पोत, प्रकार यांची माहितीही सहजच झाली. आज व्यवसाय करताना या अनुभवाचा फायदा होत असल्याचे वृषालीताई सांगतात. आपल्याकडे स्वतःच्या कोणीही न वापरलेल्या साड्या असाव्यात अशी एक सुप्त इच्छा होती. पुढे संसार सुरू झाल्यावर ही हौस पूर्ण केली.
वृषालीताई सांगत होत्या….१९९८ साली वाशी सेक्टर दोन येथील कम्युनिटी हॉलमध्ये साड्यांचे प्रदर्शन होतं. मी बघायला गेले. तेव्हा पैठणी पाहिली. किंमत होती चार हजार रूपये… बापरे.. असं काहीसं मनात आलं. त्या बाई काही किंमत कमी करायला तयार होत नव्हत्या. तेव्हा वाटलं ही साडी हवीच. त्यानंतर खूप शोधलं पण पैठणी काही स्वस्त मिळेना. दोन हजार साली मुलाच्या शाळेतील जोशी बाईंनी येवल्याची सफर घडवली. पैठणी जिथे बनते त्या कारागीरांकडे घेऊन गेल्या. तिकडे साड्यांची किंमत पाहिली. मग मुंबईला येऊन पाहिलं या साड्या खूपच महागात मिळायच्या,. मग जिदद् पकडली आणि कुकींग क्लासेस मधून मिळालेले पाच हजार आणि मिस्टरांकडून घेतलेलें पाच हजार असे दहा हजार घेऊन तडक येवला गाठलं. दहा हजारांत चार पैठणी घेतल्या. त्यातली एक स्वतःसाठी ठेवली. माझी पैठणीची हौस मी भागवली. मात्र माझ्यासारख्या अनेक महिला असतील ज्यांना पैठणी हवीहवीशी वाटत असेल मग अशा महिलांसाठी मी पैठणी विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले.
आज माझ्याकडे हाताने बनविलेली चाळीस हजारापर्यंतची पैठणीही उपलब्ध आहे. ही पैठणी घेण्या-याही महिला आहेत. त्यांच्या डोळ्यात पैठणी मिळाल्याचा आनंद मला समाधान देतो. पैठणीवरून फिरणारे त्यांचे थरथरते हाथ पाहिले की मला माझी सतत आठवण येते. पैठणीच्या खरेदीसाठी केवळ महिलाच नाही तर पुरूषही येतात. त्यांचा उत्साह तर महिलांपेक्षा जास्त असतो. साडीतलं काही माहित नसतं पण कष्टाने संसार करणा-या माझ्या गृहलक्ष्मीसाठी ही साडी घेणार ही त्यांची भावना मला हळवं करते. मग मीही त्यांना पैठणीची माहिती देते. आणि त्यांच्या चेह-यावर बदलणारे भाव पाहिले की मला अभिमान वाटतो.ही आपली संसस्कृती असल्याचा.
पैठणीची विक्री हा माझ्यासाठी व्यवसाय नाही ती माझी आवड आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती जगभरात पोहोचावी आणि येवल्यातल्या कारगिरांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा यासाठीची एक धडपड आहे. लोटस, राजहंस, कडिअल, महाराणी, मिनावर्क अशा वेगवगळ्या प्रकारांमध्ये पैठणी उपलब्ध आहेत. पैठणीची प्रसिद्धी आता इतकी वाढली आहे की, दक्षिणेकडील राज्यांमध्येही आता पैठणीचे उत्पादन घेतले जात असल्याचे दिसून येते. वृषालीताईंकडे केवळ पैठणीच नाही तर सेमी पैठणी, सिल्क साडी, शिवलेली नववार साडी, आणि पैठणी शेले, पैठणी कुडता पिसही उपलब्ध आहेत.
वडिलांकडून मिळालेला चित्रकलेचा वारसा उपयोगी पडतोय
पैठणीमध्येही आजकाल नवीन ट्रेंड आहेत. ग्राहकांना सातत्याने नवीन काहीतरी हवं असतं. त्यामुळे वडीलांकडून मिळालेला चित्रकलेचा वारसा मला या व्यवसायात उपयोगी पडतो. नवीन डिझाईन देऊन मी येवल्याच्या कारागीरांकडून पैठणी बनवून घेते. दोन-तीन साड्या एकत्र करूनही बनलेली पैठणी माझ्याकडे मिळते. मशीनमध्ये बनविलेल्या साड्या पाच हजारांपासून पुढे तर हाताने विणलेल्या साड्या सहा हजारांपासून मिळतात. केवळ नवी मुंबईच नव्हे तर ठाणे, मुंबई,उरण येथूनही महिला पैठणी खरेदीसाठी येतात.
शब्दांकन – स्वप्ना हरळकर
AV News Bureau