नवी मुंबई, 15 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला आता आणखी एक थांबा मिळणार आहे. प्रवाशांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळावा यासाठी तेजस एक्सप्रेस 20 मार्चपासून चिपळूण रेल्वे स्थानकातही थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
- मोठा गाजावाजा करीत कोकण रेल्वे मार्गावर संपूर्ण वातानुकूलित तेजस एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. मात्र तिकिटाचे चढे दर तसेच मर्यादीत रेल्वे स्थानकांवरच थांबा देण्यात आल्यामुळे आठवड्यातून पाच दिवस धावणाऱ्या या गाडीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या गाडीतून प्रवास करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता तेजस एक्सप्रेस चिपळूण स्थानकातही थांबविण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे चिपळूण आणि आजुबाजूच्या परिसरातील प्रवाशांनाही तेजसने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
तेजसचे सध्याचे थांबे
- दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ करमाळी
तेसजचे चिपळूण स्थानकातील वेळापत्रक
- गाडी क्रमांक 22119 सीएसएमटी –करमाळी ही गाडी सकाळी 9.4 ला चिपळूण रेल्वे स्थानकात थांबेल.
- गाडी क्रमांक 22120करमाळी- सीएसएमटी ही गाडी सायंकाळी 6.18 ला चिपळूण रेल्वे स्थानकात थांबेल.