महापौरांनी रुग्णालयातील अन्न तपासले

महापौर जयवंत सुतार यांच्याकडून ऐरोली येथील महापालिका रुग्णालयाची पाहणी

नवी मुंबई, 23 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील सेवा सुविधांची पाहणी केली तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची स्वतः चव घेवून त्यांचा दर्जा तपासला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी महापालिकेच्या या रुग्णालयातील उणिवांबद्दल महापौर जयवंत सुतार यांनी नाराजीही व्यक्त केली तसेच आरोग्य विभागाला त्याबाबत सूचनाही केल्या.

 

महापौरांना आढळलेल्या उणिवा व प्रशासनाला दिलेले निर्देश

  • रुग्णालयातील रुग्णांसाठीच्या बैठक व्यवस्थेत वाढ करावी
  • लसीकरण विभागामध्ये बालकांसाठी वातानुकुलीत यंत्रणा असावी
  • दंतरोग विभागामध्ये विशिष्ट प्रकारची खुर्ची व्यवस्था करणे
  • कान, नाक, घसा तपासणी विभागामध्ये ऑटोस्कोपची पुर्तता करणे
  • मनोरुग्ण विभागामध्ये पुरक औषधांचा त्वरीत पुरवठा करणे
  • रक्त तपासणी करीता सेल काऊंटर या प्रकारच्या आणखी एका मशीनची व्यवस्था करणे
  • प्रसुती कक्षामध्ये बालकांना ठेवण्यासाठी वापरल्या जाणा-या काचेच्या पेटीची पूर्तता करणे.
  • प्रसुती पश्चात व स्त्री रोग कक्षामध्ये सकाळी व संध्याकाळी देण्यात येणा-या चहा बरोबर बिस्किटे देणे
  • रुग्णालयात मोकळ्या जागेत रुग्णांचे नातेवाईक जमिनीवर बसून जेवण करतात हे बघून त्याठिकाणी जेवणासाठी त्वरीत टेबल खुर्चीची व्यवस्था करावी.
  • बालरोग कक्षामध्ये हवा खेळती राहण्यासाठी अनुषंगीक व्यवस्था करावी .

याशिवाय सेक्टर 2 ऐरोली येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीला भेट देऊन त्याची पाहणी केली व त्याठिकाणी त्वरीत विद्युत विषयक उर्वरीत कामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश विद्युत अभियंत्यांना दिले.

याप्रसंगी त्यांच्या समवेत नगरसेविका नंदा काटे व नगरसेवक मनोज हळदणकर, सहा. आयुक्त तुषार बाबर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.