महाराष्ट्र भवनासाठी मनसे आक्रमक

  • 1 मे रोजी मनसे करणार भवनाचे भूमिपूजन,  मनसेचा सिडकोला इशारा

मुंबई, 15 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्र भवनासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडांवर अद्याप बांधकाम केलेले नाही. इतर राज्यांची भवने नवी मुंबईत दिमाखात उभी असताना महाराष्ट्राच्याच भवनाबाबत प्रशासनाकडून उदासिनता दाखविण्यात येत असून १ मे पर्यंत महाराष्ट्र भवनाचे भूमीपुजन केले गेले नाही तर मनसे  भूमीपुजन करील,असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.

नवी मुंबई शहरात विविध राज्यातील लोकांना त्यांच्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार करता यावा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडता यावेत यासाठी सिडकोने विविध राज्यांना नवी मुंबईत भूखंडे देऊन व बांधकाम करून भवन बांधून दिलेले आहेत. मात्र महाराष्ट्र भवनसाठी वाशी येथे प्लॉट- ३९, सेक्टर-३०अ येथे गेल्या १५ वर्षांपासून भूखंड आरक्षित असून त्यावर महाराष्ट्र भवनची कधी निर्मिती करणार ? महाराष्ट्र भवनचे भूमीपूजन कधी होणार व कधी वीट लावणार असा सवाल मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना पाठवलेल्या निवेदनात विचारला आहे.

 

खारघर येथे सिडकोने जम्मू काश्मीरसाठी देखील भूखंड आरक्षित केला आहे. आत्तापर्यंत वाशी स्थानक परिसरात उत्तराखंड, ओडीसा, आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि उत्तर प्रदेश भवनसाठी भूखंड सिडकोने दिले आहेत. काही भूखंडांवर भवनही बांधून दिले आहेत. मात्र महाराष्ट्र भवन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध कामांसाठी मुंबई व आजूबाजूच्या शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र भवनची निर्मिती अद्याप का नाही ? असा प्रश्न नवी मुंबई मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सिडकोला विचारला आहे. महाराष्ट्र भवनच्या निर्मिती मध्ये काय अडसर आहे तो स्पष्ट करावा असेही निवेदनात मनसेने म्हटले आहे.

  • सिडको महामंडळ महाराष्ट्रात असल्याचा सिडको प्रशासनाला विसर पडला आहे की काय अशी प्रतिक्रिया मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी नवी मुंबईतील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून पत्र देणार आहोत असे मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी कळविले आहे.