रस्त्यांवर उभ्या असलेल्या 348 वाहनांवर कारवाई

नवी मुंबई, 2 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

वी मुंबई महानगरपालिका परिसरातील अनेक रस्त्यांवर बराच काळ बंद स्वरुपात उभ्या असलेल्या 348 बेवारस वाहनांवर नवी मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. यापुढेही रस्त्यावर बेकायदेशीररित्या दिर्घ काळ गाड्या उभ्या करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाहतुकीला तसेच स्वच्छतेच्या कामात अडथळा होणार नाही अशा पद्धतीने घोषित केलेल्या पार्किंग क्षेत्रातच वाहने उभी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

  • रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त आणि बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे रहादारीला अडथळा होतोच शिवाय वाहनांखालील कचरा साफ करता येत नसल्याने स्वच्छतेला बाधा पोहचते. त्यामुळे अशा वाहन मालकांनी आपापली वाहने उभ्या असलेल्या जागांवरून हटवावेत असे अनेकदा महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी अशा प्रकारची बेवारस, नादुरूस्त व अपघातग्रस्त वाहने अनेक ठिकाणी आढळून येतात.याबाबत “स्वच्छ सर्वेक्षण 2018” च्या अनुषंगाने संपूर्ण शहरात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगातून स्वच्छतेचा जागर उभा राहिलेला दिसून येत असताना या बराच काळ रस्त्यांवर एकाच जागी उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार अशा वाहन मालकांनी आपल्या मालकीची अनेक दिवस रस्त्यांवर एकाच जागी उभी असलेली वाहने त्वरित हटवावीत असे अंतिम आवाहन करण्यात आले होते.

धडक कारवाई केलेली वाहने

  • 12 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत बेलापूर विभागात 30 चार चाकी व 32 दुचाकी, नेरुळ विभागात 13 चारचाकी, 5 दुचाकी आणि 2 थ्रीव्हिलर, वाशी विभागात 15 चारचाकी, 28 दुचाकी व 2 थ्रीव्हिलर, तुर्भे विभागात 41 चारचाकी, 27 दुचाकी आणि 15 थ्रीव्हिलर, कोपरखैरणे विभागात 29 चारचाकी, 8 दुचाकी आणि 6 थ्रिव्हिलर, घणसोली विभागात 34 चारचाकी व 3 दुचाकी, ऐरोली विभागात 31 चारचाकी, 10 दुचाकी आणि 6 थ्रीव्हिलर, दिघा विभागात 5 चारचाकी, 5 दुचाकी व सहाचाकी 1 एकूण सहाचाकी 1, 198 चारचाकी, थ्रीव्हिलर 31, दुचाकी 118 अशा एकूण 348 वाहनांवर टोईंगव्दारे वाहने त्या जागेवरून उचलून नेण्याची कारवाई करण्यात आली.  टोईंगव्दारे उचलण्यात आलेली वाहने महानगरपालिकने रबाळे सेक्टर 6 तसेच कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमी शेजारील मोकळ्या जागेत हलविण्यात आलेली आहेत.

 

  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर कुणाचेही वाहन अनेक दिवसांपासून उभे करून ठेवलेले असल्यास संबंधित वाहन मालकाने ते त्वरीत योग्य जागी हलवावे असे आवाहन पुनश्च: करण्यात येत आहे. अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने सदर वाहन हलविण्यात येईल व त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.