नवी मुंबई, 1 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:
खग्रास चंद्रग्रहण, ब्ल्यू मून आणि सुपर मून एकाच वेळी पाहण्याचा योग 31 जानेवारीला जुळून आला. हा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी आल्याने हे ग्रहण सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरले होते. ग्रहणाविषयीच्या अंधश्रध्दांना बाजूला सारत नागरिकांनी या खगोलिय घटनेचा आनंद घेतला.
पौर्णिमेदिवशी चंद्र पृथ्वीजवळ येतो, तेव्हा चंद्रबिंब 14 टक्के मोठं दिसतं, याला सुपर मून म्हणतात. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुस-या पौर्णिमेला ब्ल्यू मून असं म्हटलं जातं.
बुधवारी संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरूवात झाली. संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीला सुरूवात झाली. पण त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने दिसू शकले नाही. पण अवघ्या पाच मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय झाला आणि साध्या डोळ्यांनी चंद्रबिंब लाल रंगाचे दिसू लागले. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ‘ ब्लड मून ‘ म्हणतात. रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटले, चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर आला. हा सूपर ब्लू-ब्लडमून पाहण्याचा आनंद जगभऱातील नागरिकांनी घेतला.