राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन
मुंबई, 20 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:
शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग असावा या भूमिकेतून आगामी अर्थसंकल्पाविषयी (२०१८-१९) नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
शासनाच्या योजनांसह प्रशासकीय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख व विकासाभिमुख करतानाच धोरण निर्मितीत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळविण्यासाठी शासनामार्फत नागरिक, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ व्यक्तींकडून वेळोवेळी सूचना मागविण्यात येतात. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या उचित सूचना-अपेक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्याच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ करणे, खर्चाची बचत करणे यासह अस्तित्त्वात असलेल्या योजना, यंत्रणा, प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना सूचना करता येतील. त्याचप्रमाणे नवीन योजना, यंत्रणा आणि प्रक्रिया निर्माण करण्यासाठी देखील आपले अभिप्राय देता येतील. नागरिकांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या सूचना पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.