नवी मुंबई, 13 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:
नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर बराच काळ बंद स्वरुपात उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होतो तसेच
रहादारीला अडथळा होतो. ही वाहने त्वरित हटवावीत असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेले होते. सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात वाहनांवर कायदेशीर नोटिसा चिटकवून वाहने हटविण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार धडक मोहिम हाती घेत पहिल्या टप्प्यात 112 वाहनांवर टोईंगव्दारे वाहने हटविण्यात आली.
बराच काळ रस्त्यांवर एकाच जागी उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होतो. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार अशा वाहन मालकांनी आपल्या मालकीची अनेक दिवस रस्त्यांवर एकाच जागी उभी असलेली वाहने त्वरित हटवावीत असे अंतिम आवाहन करण्यात आलेले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बेलापूर विभागात 14 चार चाकी व 2 दुचाकी, नेरुळ विभागात 5 चारचाकी व 2 दुचाकी, वाशी विभागात 5 चारचाकी, 4 दुचाकी व 1 थ्रीव्हिलर, तुर्भे विभागात 17 चारचाकी व 18 दुचाकी आणि 6 थ्रीव्हिलर, कोपरखैरणे विभागात 11 चारचाकी, घणसोली विभागात 9 चारचाकी, ऐरोली विभागात 11 चारचाकी व 2 थ्रीव्हिलर आणि सहाचाकी 1, दिघा विभागात 3 चारचाकी व सहाचाकी 1 एकूण सहाचाकी 2, 75 चारचाकी, थ्रीव्हिलर 9, दुचाकी 26 अशा एकूण 112 वाहनांवर टोईंगव्दारे वाहने त्या जागेवरून उचलून नेण्याची कारवाई करण्यात आली. टोईंगव्दारे उचलण्यात आलेली वाहने महानगरपालिकने रबाळे सेक्टर 6 तसेच कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमी शेजारील मोकळ्या जागेत हलविण्यात आलेली आहेत.
रस्त्यांवर कुणाचेही वाहन अनेक दिवसांपासून उभे करून ठेवलेले असल्यास संबंधित वाहन मालकाने ते त्वरीत योग्य जागी हलवावे असे आवाहन पुनश्च: करण्यात येत आहे. अन्यथा महानगरपालिका हे वाहन हलवून व त्यावर कायदेशीर कारवाई करेल असे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.