महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे देशातील पहिले मोबाईल ॲप
मुंबई, 10 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असलेले एम.एम.सी. या मोबाईल ॲपचे लोकार्पण आज मुंबईत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या द्वारे डॉक्टरांना वैद्यकीय परवान्यांचे नुतनीकरण ऑनलाईन करता येणार आहे, तर सर्व सामान्य रुग्णास आपल्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती एका क्लीक द्वारे उपलब्ध होणार आहे. देशातील अशाप्रकारचे हे पहिले मोबाईल ॲप आहे.
या ॲपमुळे नोंदणीकृत असलेल्या सुमारे 1 लाख 40 हजार वैद्यकीय व्यावसायिकांना परिषदेच्या कार्यालयात न येता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असले तरी या ॲपद्वारे परिषदेकडे ऑन लाईन अर्ज सादर करणे, शुल्क अदा करणे, तसेच परिषदेकडून तात्पुरत्या नोंदणीचे प्रमाणपत्र, चांगल्या वर्तणुकीचे प्रमाणपत्र, असे विविध फायदे मिळणार आहेत. हे मोबाईल ॲप गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करुन घेता येईल. तसेच अशा प्रकारे ॲप डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास हे मोबाईल ॲप वैद्यकीय परिषदेच्या www.maharashtramedicalcouncil.in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेता येऊ शकेल अशी माहिती वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे यांनी दिली.
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला मोबाईल ॲपद्वारे निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळांना (सी.एम.ई) उपस्थित राहिल्यामुळे किती क्रेडीट पॉईंट मिळाले याची माहिती ही या ॲपव्दारे मिळू शकेल. परिषदेने परिषदेच्या वेबसाईटवर जी माहिती प्रसिध्द केलेली आहे ती माहिती देखील या ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली.
कायमस्वरुपी नोंदणी करता वैद्यकीय व्यवसायिकांना ॲपद्वारे अर्ज सादर करणे तसेच ऑनलाईन शुल्क भरणे इ. कामे घर बसल्या करता येतील. तसेच नोंदणीच्या माहितीची वैधता ऑनलाईल तपासता येणार आहे.