मुंबई,23 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
राष्ट्रीय राज्य महामार्गालगतच्या मद्य विक्री परवाना बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन मद्य विक्री परवाना मंजूर करण्याबाबत निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
हे निर्बंध राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या अंतर्गत असलेल्या महानगरपालिका, शहर, गाव, किंवा स्थानिक प्राधिकरण यांना लागू राहतील. यापूर्वी मंजूरी मिळून देण्यात आलेला मद्यविक्री परवाना दिनांक 31.03.2017 पर्यंत कार्यान्वित राहतील. परंतु 01.04.2017 नंतर मद्यविक्री परवाना नूतनीकरण करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मद्याचे चिन्ह किंवा मद्य उपलब्ध असल्याबाबत जाहिरातीवरही निर्बंध टाकण्यात आले आहे. अशा जाहिराती व चिन्ह तात्काळ काढून टाकण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून मद्याविक्रीचे परवाने दिसू नये किंवा सहजरित्या जाणाऱ्या मार्गावर परवाने असू नये आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या बाहेरील काठापासून किंवा सेवारोड पासून 500 मीटरच्या आत मद्यविक्री परवाने नसावे असं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे.
उशिरापर्यंत दारूविक्री
नाताळ व नववर्षाच्या स्वागतानिमित्त दारूच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यापार्श्वभूमीवर दिनांक 24, 25 व 31 डिसेंबर रोजी राज्यातील दारूची दुकाने रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ई परवाना असलेले बीअर बारदेखील पहाटे पाच वाजेपर्यत सुरू राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफ एल -2 ) व एफएलडब्ल्यू -2 व एफएलबीआर-2 हा परवाना असलेली मद्याची दुकानं ही नमूद दिवसांत पहाटे 1 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सीएल-3 मद्याची दुकाने क वर्ग नगरपालिका व जिल्हापरिषद क्षेत्रात रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत आणि त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री 12 ते पहाटे 1.00 वजेपर्यंत उघडी ठेवता येतील. तसेच नमूद दिवशी ई परवाना असलेले बीअर बार, एफएल -3, एफएल -4, ई-2, नमुना ई(बीअर बार ) पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहतील.