मुंबई, नवी मुंबई, 3 जानेवारी 2018/avirat vaatchal news:
भीमा-कोरेगाव येथील हल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटच्या आवारात माथाडी कामगार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर किरकोळ दगडफेकीचा प्रकार घडला. यामध्ये एक आंदोलनकर्ता जखमी झाल्याचे समजते. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल आणि आज दिवसभरात 7 एनएमएमटी बसेसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई परिवहनच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंबई, उपनगरांसह राज्यभरात बंद शांततेत पार पडला.
महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद
आजच्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही तुरळक घटना वगळता हा बंद सुरळित पार पडला. बंद यशस्वी झाल्याचे सांगत संध्याकाळी 4 वाजता हा बंद मागे घेत असल्याचे भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, आज सकाळी सुरू झालेल्या या बंदचा परिणाम विशेष दिसून आला नाही. मात्र दहाच्यानंतर आंदोलनकर्ते हळूहळू रस्त्यावर उतरू लागले. मुंबईतल्या पूर्व, पश्चिम, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको करत आंदोलनकर्त्यांनी हे मार्ग काही काळ रोखू धरले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये 48 बेस्टच्या बसेसचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच हार्बर मार्गावरही काही ठिकाणी रेल रोको केल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. यामुळे मध्य रेल्वेने 110 उपनगरीय रेल्वे सेवा खंडित केल्या. संध्याकाळी रेल्वे सेवा सुरळीत झाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.
शाळा, महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली नव्हती. त्यामुळे नवी मुंबईत अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. मात्र दुपारनंतर शाळाही बंद असल्याचे मेसेज पालकांना पाठविण्यात आल्याचे आढळून आले.