ठाणे, 18 डिसेंबर 2017/ avirat vaatchal news:
ठाणे शहराच्या वैभवात ऐतिहासिक भर घालणा-या पारसिक चौपाटी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे चौपाटीचे ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होणार आहे. तशा सूचना आज आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नगर अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना दिल्या आहेत. आयुक्त जयस्वाल यांनी आज विविध प्रकल्पांची, रस्त्यांची, पारसिक चौपाटी आणि स्टेशन परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी स्टेशन येथे त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त जयस्वाल यांनी घोडबंदर रोडपासून आपल्या पाहणी दौ-यास सुरूवात केली. पोखरण रोड नं. ३, टिकुजिनी वाडी, ग्लॅडी अल्वारीस मार्ग, गांधीनगर चौक, पोखरण रोड नं. २ या रस्त्यांची पाहणी करून सदर काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले. त्याचवेळी त्यांनी गांधीनगर ते शिवाईनगर चौकपर्यंत सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाची पाहणी करून सदर सायकल ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच व्होल्टास कंपनी येथील नाल्यावरील पूलाची रूंदी वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह स्टेशन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावदेवी मैदानातील भुयारी वाहन तळाबरोबरच गावदेवी उद्यानामध्येही भुयारी वाहनतळ सुरू करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच गावदेवी मैदान येथे सायंकांळी ६ ते १० या वेळेत तात्पुरती पार्किंग व्यवस्था करता येईल का ही शक्यताही पडताळून पाहण्यास सांगितले. त्याचप्रमाणे स्टेशन परिसरातील रिक्षांसाठी पर्यायी मार्गिका काढता येवू शकते का याबाबतही पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.