ठाणे, 14 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
तक्रारदाराची तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल करून घेण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मंचाच्या कनिष्ठ लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले. किशोर विश्वनाथ मानकामे (वय 56) असे या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या अशिलाची केस ठाणे येथील ग्राहक तक्रार निवारण मंच येथे दाखल करून घेण्यासाठी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर विश्वनाथ मानकामे यांनी प्रत्येक फाइलसाठी 200 रुपये याप्रमाणे 5 फाइल्ससाठी 1000 रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने याप्रकरणी शहानिशा केली असता किशोर विश्वनाथ मानकामे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना किशोर विश्वनाथ मानकामे या कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडल्याची माहिती उपअधिक्षक वाल्मिक पाटील यांनी दिली.
किशोर विश्वनाथ मानकामे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.