तेजस गोळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री विजेता
नवी मुंबई,22 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद अनुक्रमे रेल्वेचा किरण पाटील आणि स्ट्रॉंग लाइफ जिमचा तेजस गोळे यांनी पटकावले. प्रेक्षकांनी तुडूंब भरलेल्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
नवी मुंबई राज्यस्तरीय महापौर श्री किताब सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक रक्कम व चषकासह रेल्वेच्या किरण पाटील यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते स्विकारला. तर नवी मुंबई क्षेत्र श्री किताबाची रुपये 35 हजार रुपयांचे पोरितोषिक आणि चषक तेजस गोळे याला क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती लिलाधर नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई उपनगरच्या अभिषेक खेडेकर या शरीरसौष्ठवपट्टूने राज्यस्तरीय “बेस्ट पोझर” सन्मान इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनचे सेक्रेटरी चेतन पाठारे यांच्या हस्ते तसेच पुण्याच्या जुबेर शेख या शरीरसौष्ठवपटूने “मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर” किताब स्विकृत नगरसेवक सुरज पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रक्कमेच्या पारितोषिकासह स्विकारला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डींग असोसिएशनचे पदाधिकारी विक्रम रोठे, शरद मारणे, राजेश सावंत, मदन कडू, वरूण श्रीनिवासन, शंकर कांबळी, सुनिल शेडगे, दिलीप फोडकर, हेमंत खेबडे, अजय खानविलकर, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ किलोपर्यंत आणि ८५ किलोवरील अशा ८ वजनी गटांत संपन्न झालेल्या “राज्यस्तरीय नवी मुंबई महापौर श्री” स्पर्धेत तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहित करणारे व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या ५०,५५, ६०, ६५, ७० किलोपर्यंत व ७० किलोवरील अशा ६ वजनी गटांच्या “नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री” स्पर्धेतील विजेत्यांस वजनी गटानुसार रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
ई गव्हनर्न्सच्या दृष्टीने यशस्वी पाऊल टाकत विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या पारितोषिक रक्कमा त्यांच्या बँक खात्यात आर.टी.जी.एस.व्दारे थेट जमा करण्यात येणार आहेत. राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात शरीरसौष्ठव रसिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
- महापौरांचे मनोगत
आधुनिकतेप्रमाणेच परंपरा जपणारे नवी मुंबई शहर असून विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम महापालिका करीत आहे. यामधून निश्चितच विविध खेळांमध्ये शहराचा नावलौकिक देशापरदेशात उंचावणारे गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी यापुढील काळात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष दिले जाईल असे सांगत आज मोठ्या संख्येने शरीरसौष्ठव स्पर्धेला उपस्थित युवक बघून तरूणांचा व्यायामाकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन लक्षात घेऊन समाधान वाटते अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.