गृह राज्यमंत्री दीपक केसरकर
मुंबई, 29 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
वाहतूक नियंत्रण व अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा द्रुतगती महामार्गांवर वापर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत दिले. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वाहतूक यंत्रणेसह ड्रोनचाही वापर करावा अशीही सूचनी केसरकर यांनी दिली.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी व प्रमाण कमी करणे तसेच महामार्गांची सुरक्षा व उपाययोजना करण्यासंदर्भात करण्याकरिता आज मंत्रालयात गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव रजनिश सेठ, महामार्ग सुरक्षा अपर पोलीस महासंचालक जयजीत सिंग व एम.एस.आर.डी चे अधिकारी.धोटे आदी उपस्थित होते.
महामार्गावरील अपघात टाळता येऊ शकतात अथवा त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा. नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याचा उपयोग जनतेला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी करावा. यावेळी मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, मुंबई-गोवा या महामार्गांवर वाढलेली अपघातांची संख्या याबाबत चिंता व्यक्त करुन अधिकाऱ्यांना नवीन योजना, नवीन तंत्रज्ञान स्विकारुन, आहे ते तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी सूचना केल्या.
केल्ट्रॉन अपघात नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा राज्यात समावेश करण्याबाबत विचार सुरु असून राष्ट्रीय महामार्गांवर लेन कटींग, ओव्हर स्पीड, ओव्हर टेक या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.