मुंबई, 28 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यात दिरंगाई होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी दिले.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बडोले बोलत होते.
- सफाई कामगारांना लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशी लागू होणे आवश्यक असून सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. मागील बैठकांचा आढावा घेऊन ज्या विभागामार्फत किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रश्न सोडविण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना कार्यवाही का झाली नाही, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे बडोले यांनी सांगितले.
- सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्या संदर्भात काही कालबाह्य झालेले शासन निर्णय रद्द करुन नव्याने यावर निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी समिती नेमून त्यावर निर्णय होणे गरजेचे आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सफाई कामगारांच्या नेमणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रतीक्षा यादीचा कालावधी निश्चित करणे या बाबतही शासनस्तरावर शिफारस करण्यात येईल.
- सफाई कामगारांची वारसा हक्कानुसार नेमणूक व्हावी. नेमणूक केल्यानंतर तीन महिने या कर्मचाऱ्यांनी विना परवानगी अथवा रजा घेतल्यास त्याला काढून टाकण्यात येते. ही तीन महिन्याची अट रद्द करावी, लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून नेमणुकीसाठी तयार करण्यात आलेली जुनी प्रतीक्षा यादीच अंमलात आणावी, अशा विविध मागण्या यावेळी केल्या.