‘त्या’ म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश

मुंबई,  23 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau :

सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसनाच्या कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात बुधवारी आयोजित पत्राचाळ आणि गोरेगावच्या मीठानगर वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोषी म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

अनेक वर्षापासून विकासकांनी घराचे बांधकाम रखडवले आहे. चाळीतील रहिवाश्यांचे घरभाडे विकासकाने वर्षभरापासून दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागांना सांगितले.

या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी उपस्थित होते.