- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई, 14 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणारे 107 प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे दिली. या मान्यतेमुळे प्रकल्पांसाठी पुढील दोन वर्षात उर्वरित 10 हजार कोटी रुपये राज्याला प्राप्त होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासनाने सादर केलेल्या प्रस्ताव सादर केला होता. त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील जलसिंचन प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारने सकारात्मकता दाखविल्यामुळे लवकरच राज्यातील तब्बल 107 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यास चालना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.