- उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे विजयी
नवी मुंबई, 9 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
नवी मुंबईच्या महापैरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार यांची निवड झाली आहे. सुतार यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांचा पराभव केला.
गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. राष्ट्रवादीतर्फे अनेक उमेदवारांची नावे होती. मात्र पक्षाच्या नेत्यांनी सभागृह नेते जयवंत सुतार यांच्या नावाला पसंती दिली. तर शिवसेनेतर्फे विजय चौगुले यांचा अर्ज बाद झाल्यामुळे आयत्यावेळी सोमनाथ वास्कर यांनी अर्ज भरला. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुतार यांना 67 मते पडली तर वास्कर यांना 38 मते मिळाली. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे सुतार यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे अपेक्षेनुसार सुतार यांची महापौरपदी निवड झाली आहे.
दरम्यान, उपमहापौरपदासाठी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यामुळे साऱ्यांचेच लक्ष उपमहापौरपदाकडे होते. उपमहापौरपदासाठी मंदाकिनी म्हात्रे यांनी अर्ज भरला होता. मात्र म्हात्रे यांच्या उमेदवारीला विरोध करीत वैजयंती भगत यांनीही अर्ज भरल्यामुळे पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना 64 मते मिळाली तर शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांना 38 मते मिळाली. तर काँग्रेसतर्फे बंडखोरी करणाऱ्या वैजयंती भगत यांना केवळ 3 मते मिळाली आहेत.