अंगणवाडी सेविकांचे मानधन जमा

मुंबई, 9  नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे बँक खाते, आधारकार्डाशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या एकूण 1 लाख 90 हजार सेविका व मदतनीस यांचे  सप्टेंबर 2017 पर्यंतचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरीत अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकखाते आधारशी जोडणी तात्काळ करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अंदाजे एकूण 2 लाख 2 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन केंद्र शासनाच्या सुचनेनुसार PFMS द्वारे सेविकांच्या आधारकार्डाशी संलग्न केलेल्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा जुलै 2017 पासून सुरु करण्यात आली आहे.  एकूण 1 लाख 90 हजार सेविका व मदतनीस  यांचे सप्टेंबर 2017 पर्यंतचे मानधन त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच दोन रजिस्टर खर्चासाठी प्रत्येक वर्षी अंगणवाडी केंद्रास देण्यात येणारा 1000 रुपये परिवर्तनीय निधीही त्यांना देण्यात आल्याचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कमलाकर फंड यांनी सांगितले.

 

  • परभणी जिल्हयातील नागनगांव (बोर्डी) ता.जिंतूर येथील अंगणवाडी सेविका सौमित्रा भगवान राखुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानधनाअभावी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. जिंतूरच्या प्रकल्प-१ मध्ये एकूण २६९ अंगणवाडी सेविका व मदतनीस असून त्यापैकी २६६ मदतनीस आणि सेविकांचे बँकखाते आधारशी संलग्न केले आहे. उर्वरित ३ सेविकांचे बँक खाते व आधारकार्ड याचा तपशील वेळेत त्यांच्याकडून प्राप्त न झाल्याने मागील ४ महिन्याचे मानधन वितरीत करण्यात आलेले नाही. या तीन सेविकांमध्ये सौमित्रा भगवान राखुंडे यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीमध्ये समजते की, त्यांनी लिहिलेली चिठ्ठी वस्तुस्थितीशी सुसंगत वाटत नाही. आत्महत्येपूर्वी त्यांचे घरगुती किंवा इतर काही वादविवाद होते किंवा नाही याबाबत पोलीस तपास सुरू आहे, असे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कमलाकर फंड यांनी सांगितले.