- पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार
मुंबई, 31 ऑक्टोबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील तीन पादचारी पूल लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत. एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड पूल आणि आंबिवली येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वेचे तीन पादचारी पूल 1 जानेवारी पर्यंत बांधून पूर्ण करू, असं आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाची पाहणी केली. लष्कराची मदत घेऊन हा पूल बांधता यावा यासाठी आज ही पाहणी करण्यात आली. एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत – म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो 1 जानेवारी पर्यंत प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. सैन्याने इथे येऊन पाहणी केली आहे, ब्रीज कुठे बांधवा याचं मूल्यमापन करण्यात आले आहे. कामाच्या प्रत्येक टप्प्यात सैन्य इथे असेल, असे आश्वासन संरक्षण मंत्री सीतारमन यांनी दिलं.
29 सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन पादचारी पूलावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत २3 निष्पाप बळी गेले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हा दुर्घटनेला जवळपास महिना उलटून गेल्यानंतरही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करत नसल्याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.