समाजाकार्यात रमते

सुनिता देशमुख

सेक्टर -५०, नवी मुंबई

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या  एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म झाला. आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असं आमचं कुटुंब. गावातल्या सर्वसाधारण मुलांसारखंच आमचं जीवन. शाळेत जायचं, खेळायचं, घरातली कामं करायची. कधी आईवडिलांसोबत शेतावर जायचं. असाच दिनक्रम असायचा.  पश्चिम महाराष्ट्र आणि राजकारण हे समीकरण आहे, असं नेहमी बोललं जातं. त्यामुळे गावात, तालुक्यात घडणाऱ्या  राजकीय घडामोडींची चर्चा नेहमी कानावर पडायची. तसेच सुदैवाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम हे माझे काका . त्यामुळे राजकारण हा विषय माहित होता. पण स्वतः राजकीय क्षेत्रात कधी सक्रीय होईन असंही वाटलं नव्हतं. गावातील महिला मंडळ, हळदी कुंकूसारख्या कार्यक्रमांमध्ये शालेय जीवनापासूनच सक्रीय होते.  शालेय शिक्षण पूर्ण करुन कॉलेजमध्ये गेले. शिक्षण पूर्ण झाले की ठरल्याप्रमाणे आता मुलीचं लग्न लावायचं असा घरातील वडिलधाऱ्यांचा निर्णय आणि आमच्या साताऱ्यातीलच भोजगावचे रहिवासी असणाऱ्या तानाजी देशमुख यांच्याशी लग्न झाले. ते मुंबईत नोकरी करीत होते. परंतु मी गावातच रमायचे. त्यामुळं लग्नानंतर पहिली तीन वर्ष गावातच राहिली. त्यानंतर पतीसह नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथं रहायला आलो. नव्या महिलांशी ओळख, नवे शेजारी आणि शहरातील संसाराचा नवा अध्याय सुरू झाला. नवी मुंबई शहरात आल्यानंतर मी महिला मंडळांचे कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हजर राहू लागले. त्यातूनच विविध उपक्रमांमध्ये अधिक सक्रीय व्हायला सुरुवात केली. या काळात सुरज आणि धीरज या दोन गोड मुलांचा जन्म झाला. मुलांच्या जन्मानंतर घरातच जास्त वेळ जावू लागला.  कुटुंब वाढलं आणि 1999 मध्ये आम्ही नेरूळ, सीवूड येथे रहायला आलो. या ठिकाणी आल्यानंतर माझ्यातील कार्यकर्तीला अधिक  वाव मिळू लागला.

2005 च्या निवडणुकीमुळे राजकीय क्षेत्रात प्रवेश

2005 ला नवी मंबई महापालिकेची निवडणूक पार पडली. माझ्या पतीचे मित्र निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळीस सामाजिक कार्याला राजकारणाची जोड द्यावी असं मनात आलं. पण आपल्याला काय जमणार आणि राजकारण खूप वाईट असतं असं लोक म्हणायचं. मग डोक्यातून तो विचार काढून टाकला. मात्र महिलांशी संबंधित माझी कामं सुरूच होती. या सामाजिक कामाला आकार देण्यासाठी मग 2006 मध्ये स्फूर्ती महिला मंडळाची स्थापना केली. या महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न, हळदी कुंकू, आरोग्य शिबिरे, योगा शिबिरे, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांना मार्गदर्श कार्यशाळा  आणि परिसरातील नागरी समस्यांबाबतही पाठपुरावा सुरू केला. माझी धडपड बघून मग माझ्या पतीनेच समाजकारणाला राजकारणाची जोड द्यायला हवी असं सुचविलं.

काँग्रेस प्रवेशानं राजकीय वाटचाल सुरू

काही दिवस विचार करून साधारणतः 2007 मध्ये पतंगराव कदम काकांची भेट घेऊन मनातली इच्छा बोलून दाखविली. त्यांनी माझे कौतूक केले आणि काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व दिले. पक्षाने मला नवी मुंबई ग्राहक संरक्षण सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आणि माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. महिला संघटना आणि काँग्रेस पक्षाची सक्रीय कार्यकर्ती अशा दोन्ही गोष्टी सांभाळत प्रभागातील नागरिकांच्या शक्य होतील तेवढ्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

पहिल्याच निवडणुकीत राजकारणाचे बारकावे समजले

ढील तीन वर्ष सातत्याने अनेक उपक्रम राबविले आणि लोकांनीदेखील माझ्या प्रयत्नांचे कौतूक केले. त्यामुळे सन 2010 ची नवी मुंबई महापालिका निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला. कुटुंबासह नागरिकांनीदेखील माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. पण मला निवडणुकीचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे विरोधाच्या राजकारणाला सामोरे जावे लागले. पहिलीच निवडणूक  आणि अनुभव कमी यामुळे निसटता पराभव स्वीकारावा लागला. काहीशी निराश झाले. विरोधकांनी टीका केली.पण दुसऱ्याच क्षणी लोकांनी दिलेला भरभरून प्रतिसादाने मला मजबूत बनविले. निवडणुकीत खूप चांगली मते पडली.लोकांनीदेखील भेटून निराश होवू नका. अपयश हिच यशाची पायरी असते. हे उमगले आणि निवडणुकीतील अपयश बाजूला सारत पुन्हा कामाला सुरुवात केली. मात्र पक्षातीलच काही लोकांनी पाठिंबा देण्यास टाळाटाळ सुरू केली.मात्र आपले सामाजिक काम थांबवायचे नाही. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यावर अधिक भर देण्याचा निश्चय केला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश

निवडणुकीतील पराभव मागे सारत मी माझे काम सुरूच ठेवले. मात्र पक्षांतर्गत विरोधाच्या राजकारणामुळे मी नाराज झाले आणि चार  वर्षानंतर म्हणजे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात प्रवेश केला. नव्या पक्षात प्रवेश केला तरी माझे सामाजिक काम तेच होते आणि राहणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून मी काम सुरू ठेवणार आहे. निवडणुका येतील आणि जातील. पण मी जोडलेली माणसे माझ्या सोबत कायमच राहतील. यात शंका नाही. गेल्या दहा वर्षांत अनेक कडू गोड आठवणी आणि अनुभव सोबतीला आहेत. तुम्ही चांगले असाल तर लोक तुम्हाला स्वीकारतील आणि तुम्ही लोकांची फसवणूक केली तर ते तुम्हाला बाजूला करतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरताना विरोधकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागते ही बाब मला आता कळून चुकली आहे. त्यामुळं कोण काय म्हणतंय, याचा अधिक विचार न करता आपण आपले काम करीत रहावे आणि लोकांसाठी शक्य तेवढे करावे, एवढाच सध्या विचार करते.

संकलन : सिद्धार्थ हरळकर

aviratvaatchalnews@gmail.com