खारघर येथील पाळणाघर प्रकरणी तक्रार नोंदवण्यास उशीर केल्याचे उघड
गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची घोषणा
नागपूर,17 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
नवी मुंबई खारघर येथील पूर्वा डे केअर प्ले स्कुल या पाळणाघरात बाळाला अमानुषपणे मारहाण झाल्याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास विलंब करणाऱ्या कर्तव्यावरील अधिकाऱ्यास निलंबित करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना दिली.याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडली होती.
या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास दिरंगाई झाली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांना त्यांच्या हद्दीतील सर्व पाळणाघरांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असेही पाटील यांनी सांगितले.
पाळणाघरांना सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक – पंकजा मुंडे
राज्यातील सर्व पाळणाघरांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच मुलांचे संगोपन करण्यासाठी तेथील आयांना प्रशिक्षण आवश्यक करण्यात येईल, तसेच पाळणाघरांसाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य संदिप नाईक, प्रताप सरनाईक, डॉ. भारती लव्हेकर, ॲड आशीष शेलार आदी सदस्यांनी याबाबत लक्ष वेधले होते.