सोसायट्या, हॉटेल्स, शाळा- महाविदयालयांना कच–यापासून खत निर्मिती करावी लागणार
नवी मुंबई,16 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या मोठ्या सोसायट्या, शाळा- महाविद्यालये तसेच हॉटेल व्यावसायिकांना आता आपल्याकडील कचऱ्याचे स्वतःच व्यवस्थापन करावे लागणार आहे. या सर्व आस्थापनांना त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने याप्रकरणी नोटीसाही बजावल्या आहेत.
खत निर्मिती बंधनकारक
- केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम2016 नुसार ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कच-याची निर्मिती होते, अशा कचरा निर्मात्याने स्वत:च्या आवारातच कच-याची विल्हेवाट करणे बंधनकारक आहे.
- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील3 ते 5 हजार चौ.मी.च्या वर क्षेत्रफळ असलेल्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या आवारातच ओला कच-यापासून खत निर्मिती करणे आणि सुका कच-याची त्यांच्या स्तरावरच विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत.
- घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने 3 ते 5 हजार चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणा-या एकूण 112 गृहनिर्माण संस्थांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.
- 135 मोठी हॉटेल्स, मॉल्स व बेन्क्वेट हॉल्स तसेच 134 शैक्षणिक संस्था यांना नोटीस वाटप करण्यात आले आहे.
- नोटीस देण्याची कार्यवाही आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सुरू आहे.या नोटिशींव्दारे त्यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कच-यापासून खतनिर्मिती करणे व सुक्या कच-याची आपल्या स्तरावरच विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त नवी मुंबईची संकल्पना साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी नागरिकांनी ओला व सुका अशाप्रकारे वर्गीकरण करून कचरा गाडीत वेगवेगळा देणे आवश्यक आहे. जेणेकरून कमीत कमी कचरा निर्माण करण्याची सवय लागेल व शून्य कचरा ही संकल्पना साकारली जाईल.
खत प्रकल्प उभारणी सुरू
- नेरूळ येथील एस.बी.आय.कॉलनी, एस.आय.ई.एस.कॉलेज, आर्मी कॉलनी, वाधवा सोसा. तसेच वाशी येथील हॉटेल फोर पॉईंट, मर्चंट जिमखाना, एन.एम.एस.ए. स्पोर्टस् असो. त्याचप्रमाणे तु्रभे येथे हॉटेल देवी प्रसाद, ट्रक टर्मिनल हॉटेल असो., संदीप हॉटेल. स्वामी विवेकानंद विद्यालय से.26 यांनी आपापल्या आवारात खत प्रकल्प उभारणीचे काम सुरु केलेले आहे.
खत प्रकल्प उभारणीसाठी जनजागृती
- बेलापूर, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली नोडमधील मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स, शाळा – कॉलेज आवारातच कचरा विल्हेवाट करण्याच्या दृष्टीने नागरिकांची व व्यवस्यिकांची मानसिकता बदलण्यासाठी विभाग कार्यालय पातळीवरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे.