“महाराष्ट्र मिशन 1 –मिलीयन” फुटबॉल खेळ महोत्सवाचे उदघाटन
मुंबई, 15 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
“महाराष्ट्र मिशन1 -मिलीयन” या फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन वन मिलिअनचा झेंडा फडकवून केले. त्यानंतर राज्यभरात 10 लाखांहून अधिक विदयार्थी फुटबॉलचे सामने खेळले.
आज सकाळी मुंबई जिमखाना येथे या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही फुटबॉलला कीक मारली. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे,आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होते.
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्रात फिफाचे काही सामने होणार असून ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
मुलांनी ई-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने आयोजित करण्यात आले होते. याबरोबरच मुंबई शहरात 21 ठिकाणी फुटबॉलचे सामने खेळवले गेले.
कोकणातही फुटबॉल स्पर्धा
कोकण विभागातील जिल्हयात पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर या जिल्हयात शुभारंभ करण्यात आला. कोकण विभागातील ठाणे- 25 हजार, पालघर- 40 हजार, रायगड- 50 हजार व रत्नागिरी- 22 हजार विद्यार्थ्यांनी फुटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविला.
कोकण विभागातील जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका यांच्या शाळेचे विद्यार्थी, क्रीडा विभागाचे अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू या स्पर्धेत मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.