अहमदाबाद , 14 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
मुंबई – अहमदाबाद या देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमिपूजन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. बुलेट ट्रेनमुळे रोजगार निर्माती होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला तर भारत आणि जपानमधील मैत्रीचं नातं म्हणजे हिंद व प्रशांत महासागरांचा संगम असल्याचे जपानचे पंतप्रधान आबे यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 1.10 लाख कोटी आहे. त्यासाठी 88 हजार कोटी रूपयांचे कर्ज जपान देणार आहे. या कर्जाचे व्याज 0.1 टकके असणार आहे जे भारताला 50 वर्षात फेडायचे आहे.
बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आदि हजर होते.
बुलेट ट्रेनमुळे केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हे तर देशात सामाजिक परिवर्तन देखील घडेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील या प्रकल्पातील बहुसंख्य मानव संसाधनांचा उपयोग केवळ भारतातून केला जाईल. जपानमधील आर्थिक मदत, तंत्रज्ञान आणि कौशल्य हस्तांतरणमुळे केवळ भारतीय रेल्वे क्षेत्रालाच फायदा होणार नाही, तर ते देशाच्या मानव संसाधन विकासासाठी फायदेशीर ठरतील असेही मोदी यावेळी म्हणाले.
भारतीय मनुष्यबळ आणि जपानी कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने भारत जागतिक हब बनणार आहे असा विश्वास जपानचे पंतप्रधान आबे यांनी व्यक्त केला.
वडोदरात पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 600 कोटी रुपयांचे रेल्वे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे केंद्र वडोदरा येथील राष्ट्रीय एकेडमी ऑफ इंडियन रेल्वेच्या (एनएआयआर) अंतर्गत उभारण्यात येणार आहे, जेथे 4000 पेक्षा जास्त हायस्पीड रेल्वे इंजिन भारतीय कॉर्पोरेट कॉर्पोरेशनला जपानी व्यावसायिकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. हाय स्पीड रेल प्रकल्पाअंतर्गत साबरमती रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले जाणार आहे.