नवी मुंबई, मुंबई प्रदूषित शहरांच्या यादीत

देशातील १२३ शहरांपैकी महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश

पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची माहिती

मुंबई, 22 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

भारतात 123 शहरे प्रदूषित आहेत. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई या आघाडीच्या शहरांसह महाराष्ट्रातील 17 शहराचा समावेश असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज दिली. पर्यावरण विभागातर्फे आज राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र २०२२’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषेदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ही कार्यशाळा हॉटेल ताज प्रेसिडंट येथे पार पडली.

प्रदुषण मुक्तीसाठी शासन आपल्या स्तरावर विविध उपाययोजना करीत असले तरी प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. महानगरपालिकेने २५ टक्के निधी प्रदुषणाव्यतिरिक्त महत्वाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महापौर यांनी हे काम मिशन म्हणून हाती घेतले पाहिजे. ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. हा प्रश्न जगातील अनेक राष्ट्रांना भेडसावत आहे. म्हणूनच आपल्या शहरात, गावात, शाळेत, समाजात आणि कुटुंबात याविषयी जागृती झाली पाहिजे. सांडपाणी, कचरा यांची योग्यरित्या विल्हेवाट लावली,असे ते म्हणाले.

  • निकृष्ट हवा असणारी १७ शहरे

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील ज्या शहरामध्ये हवा गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे यांची नावे पुढीलप्रमाणे : अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर,जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर व उल्हासनगर.

 

नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवाल 2016-17

नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवाल 2016-17 मध्येही नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार सन 2016-17 करीता अर्ध्यापेक्षा अधिक कालावधीकरीता कोपरखैरणे आणि तुर्भे येथील हवा गुणवत्ता प्रदूषण विरहीत आढळली आहे. मात्र 10 टक्के किंवा त्यापैक्षा कमी कालावधीकरीता हवा प्रदूषण वाईट किंवा खूप वाइट वर्गात आढळून आली आहे.तुर्भे, कोपरखैरणे येथील PM 2.5 आणि PM 10  प्रदूषकांमुळे हवेची गुणवत्ता बाधीत झाली आहे.

2015-16  मधील वाशी रुग्णालय,सेक्टर 10 या रहिवाशी क्षेत्रामधील नोंद झालेल्या 58 डीबी या ध्वनीमापन नोंदीच्या तुलनेत 6 टक्के वाढ  यावर्षी नोंद झाली आहे. रहदारी क्षेत्रात 66 ते 70 डीबी दरम्यान ध्वनीपातळीची नोंद करण्यात आली आहे.

खाडीतील पाण्याची गुणवत्ता मुख्यत्वेकरून सदोष आढळली. ज्यामध्ये केवळ नेरुळ पाम बीच जवळील खाडीव्यतिरिक्त सर्व निर्देशित निकष मर्यादेपे (8600 मि.ग्रॅ./ली.) अधिक आढळून आले. ठाणे खाडीलगत असलेल्या इतर शहरांमधून तसेच औद्योगिक परिसरातून विनाप्रक्रिया केल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा खाडीतील विसर्ग कारणीभूत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.