नवी मुंबईत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ

नवी मुंबई, 23 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

हवेमार्फत पसरणा-या क्षयरोगाने आता नवी मुंबईतही हातपाय पसरले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मागच्या पाच वर्षांत क्षयरूग्णांच्या संख्येत जवळपास 6.3 टक्के वाढ झाली आहे.  मागील वर्षीच्या 1795 रुग्णांच्या तुलनेत जवळपास 1909 रूग्ण या रोगाने प्रभावित झाले असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आली आहे.

क्षयरोग हा हवेमार्फत पसरणारा रोग मायक्रोबॅक्टेरियाच्या मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जातीमुळे होतो.भारतात तर  क्षयरोग हा मानवी मृत्युचे प्रमुख कारण आहे. दरवर्षी 3 लाखापेक्षा अधिक व्यक्ती या रोगामुळे मरण पावतात.

क्षयरोगाचे बॅक्टेरिया शरीरातील कोणत्याही अवयवास प्रभावित करू शकतात. विशेषतः फुफ्फुसांवर याची अधिक बाधा होत असल्यामुळे या फुफ्फुसाचा क्षयरोग असेही म्हटले जाते. जेव्हा फुफ्फुसाव्यतिरिक्त शरीरातील अन्य अवयव रोगजंतूनी बाधित होतात, तेव्हा त्यास अक्स्ट्रा फुफ्फुसाचा क्षयरोग असे म्हटले जाते.

  • फुफ्फुसाच्या क्षयरोगाची लक्षणे

ताप, छातीत दुखणे,अपचन, खोकला, वजन कमी होणे

नवी मुंबई महापालिका हद्दीत गेल्या पाच वर्षांत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आल्याचे महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालात म्हटले आहे.

क्षयरोगावर मात करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

  • क्षयरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यासाठी महापालिकेने यावर्षी आठवड्यातून तीन वेळा देण्यात येणा-या उपचाराएवजी प्रत्यक्ष निरीक्षण करून उपचार करण्यात येणा-या टी.बी. – डी.ओ.टी.एस. या नावाने ओळखल्या जाणा-या दैनंदिन उपचारांना सुरूवात केली आहे.
  • महपालिकेशी संलग्न असणा-या सर्व रूग्णालये, विनासरकारी संस्था, आरोग्य केंद्र यांमध्ये डी.ओ.टी.एस. उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • मल्टी ड्रग रेसीस्टंट( एम.डी.आर.), एस.डी. आर, अशा क्षयरोग बाधित रूग्णांवर कार्टीज बेल्ड न्युक्लीक असिड ऑम्पिलफिकेशन चाचणी( सी.बी.एन.ए.ए.टी.) करण्यात येत आहे, असेही अहवालात म्हटले आहे.