ठाणे मॅरेथानमध्ये 20 हजार धावपटू धावणार

 

ठाणे, 12 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

२८ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा  13 ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत अनेक नामवंत राष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 20 हजार स्पर्धक  भाग घेणार आहेत. चला धावूया, स्मार्ट ठाण्यासाठी ”  या  घोष वाक्यासह हजारो स्पर्धक रविवारी सकाळी 6.30 वाजता स्मार्ट ठाण्यासाठी धावणार आहेत.

  • राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय धावपटुंचा सहभाग

गेल्या वर्षीपासून या मॅरेथॉनमध्ये 21 कि.मी. पुरुष गट आणि 15कि.मी.  महिला गट या दोन मुख्य स्पर्धेतील धावपटूंना ‘टाइम चीप’ देण्यात येणार असल्याने अनेक  राष्ट्रीय धावपटू भाग घेत आहेत. या मॅरेथॉनसाठी 2019 साली होणा-या कॉमनवेल्थमध्ये कराटेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणारी आंतरराष्ट्रीय कराटेपटू संध्या शेट्टी उपस्थित राहणार आहे. या मॅरेथॉनमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये रिशु सिंग, आरती पाटील,नरेंद्र प्रताप आणि पिंटू यादव आदी खेळाडूंचा समावेश आहे.  तसेच आर्मी सर्व्हिस ऑफ इंडिया-पुणे, बॉम्बेर इंजिनिअरींग ग्रुप आर्मी, उरण, सातारा, सांगली येथून राष्ट्रीस खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • 10 गटांत स्पर्धा, 5.85 लाखाची बक्षिसे

सदर स्पर्धा विविध दहा गटांत घेण्यात येणार आहे. पहिल्या गटातील स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्तरावर पुरुषांसाठी असून तिचे अंतर 21किमी असणार आहे.  या गटातील विजेत्यांसाठी पहिले बक्षीस 75 हजार रुपये, दुसरे बक्षिस 45 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार रुपये, चौथे बक्षिस 12 हजार  रुपये असे आहे. त्याशिवाय 5 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.