राज्याकडे गरजेपेक्षा जास्त वीज

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 मुंबई, 11 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

राज्याकडे पुरेशी वीज उपलब्ध असून विजेची कोणतीही टंचाई नाही. त्यामुळे तुर्तास नवीन वीज निर्मिती प्रकल्पांची गरज नाही. आवश्यकता भासल्यास नवीन प्रकल्पाचा विचार करता येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली.

आ.विनायक मेटे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ऊर्जामंत्र्यांनीउत्तर दिले.

अकोला जिल्हयातील पारस येथे 250 मेगावॉटचे दोन वीज निर्मिती संच होते. त्यानंतर पुन्हा 250 मेगावॉटचा संच मंजूर करून तो रदद करण्यात आला आणि  660 मेगावॉटचा मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी 141 शेतकऱ्यांची 130 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून आता सौर ऊर्जेचा 60 मेगावॉटचा प्रकल्प करण्यात येत आहे. नवीन वीज निर्मिती प्रकल्पासाठी पाणी नसल्याच्या कारणावरून रदद करण्यात आला. या प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध आहे. तसेच ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्या त्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन शासन देणार काय ? असा प्रश्न मेटे यांनी उपस्थित केला होता.

त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की,  पारस येथे 250 मेगावॉटचा प्रकल्प मंजूर केला होता. पण केंद्र शासनाने 250 मेगावॉटचे प्रकल्प यापुढे टाकू नका असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यानंतर 250 मेगवॉटचा प्रकल्प होणार नाही. 660 मेगावॉटचा कोणताही प्रकल्प सध्या मंजूर नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती कायम राहतील. तथापि आज राज्याला अतिरिक्त विजेची गरज नाही. गरजेपेक्षा जास्त वीज राज्याकडे उपलब्ध आहे. याशिवाय खाजगी कंपन्याकडेही मुबलक वीज खरेदीसाठी उपलब्ध आहे. अशा स्थितीत नवीन वीज प्रकल्पाची गरज नाही. शेतकऱ्यांची मागणी असेल तर सौर वीज निर्मिती रदद करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.

यावर उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले सौर वीज निर्मिती प्रकल्पही करा. यासंदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येईल असे आश्वासनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सभागृहात दिले.