भावनिक मुद्द्यावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करणे हाच एमआयएमचा राजकीय अजेंडा- सपा नेते अबु आझमी यांची टीका
मुंबई,11 डिसेंबर 2016/AV News:
भावनिक मुद्द्यावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करणे हाच एमआयएमचा राजकीय अजेंडा असून एमआयएमचा हा डाव आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आला आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी एमआयएमवर केली आहे.
पक्षनेतृत्वाचे राजकीय धोरण आणि कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमच्या तब्बल १३३ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नुकताच समाजवादी पार्टीत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आता एमआयएमच्या भावनिक भुलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजवादी पार्टी मध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये एमआयएमचे दक्षिण मुंबई अध्यक्ष समीर ठाकुर यांच्यासह सईद मूसा, सोहेल साबूवाला, सलमान मुकादम, मतीन खान, आयशा सिद्दीकी आणि रुकसाना आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या संख्येने इतर पक्षातील कार्यकर्ते समाजवादी पार्टीत प्रवेश करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
एमआयएम निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे करुन मुस्लिम मतांचे विभाजन करते, त्यामुळे आपल्या विरोधकांना त्याचा थेट लाभ होतो. आता एमआयएमचे संपूर्ण लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांवर आहे. मात्र उत्तर प्रदेशचे मतदार एमआयएमचा हा डाव चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात एमआयएमची डाळ शिजणार नाही, असेही ते म्हणाले. पक्षनेतृत्वाच्या याच कार्यपद्धतीमुळे एमआयएम कार्यकर्त्यांचाही भ्रमनिरास होत असून समाजवादी पार्टीवरचा विश्वास वाढत आहे,असे आझमी यांनी सांगितले.