नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2017:
देशभरात रक्षाबंधन उत्साहात साजरा होत असतानाच दुसरीकडे आज रात्री चंद्रग्रहण लागणार आहे. रात्री 10.52 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 12.49 पर्यंत चंद्रग्रहण सुरू राहणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह आशिया,युरोप आणि आफ्रिका खंडातील देशांमध्येही दिसणार आहे. दरम्यान, पुढील चंद्रग्रहण 31 जानेवारी 2018 रोजी दिसणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चंद्रग्रहणाबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.
भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहणाला आज रात्री10.52 सुरुवात होणार आहे. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात होईल आणि रात्री 11.50 ला चंद्रग्रहण ठळकपणे जाणवणार आहे. त्यानंतर चंद्रावरून पृथ्वीची सावली हळूहळू सरकायला सुरुवात होईल आणि 8 ऑगस्टला पहाटे 12.49 वाजता चंद्र पृथ्वीच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडेल.
- चंद्रग्रहण कुठे दिसेल
आज रात्री दिसणारे चंद्रग्रहण पश्चिम पॅसिफिक समुद्र, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप आणि अंटार्टिका भागात दिसणार आहे. संपूर्ण चंद्रग्रहण मध्य आणि पूर्व आफ्रिका, मध्य रशिया, चीन, भारत आणि ऑस्ट्रेलियातील बहुतांश भागात दिसणार आहे. याशिवाय जगाच्या इतर भागातही विविध टप्प्यात हे चंद्रग्रहण दिसणार आहे.