फोनवरील संभाषणाची एका महिन्यात चौकशी करणार- मुख्यमंत्री
मुंबई, 2 ऑगस्ट 2017/ AV News Bureau:
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या फोनवरील संभाषणाची प्रत उपलब्ध झाली असून हे संभाषण तपासण्यासाठी फॉरेन्सिककडे पाठवून चौकशी करण्यात येईल. तसेच ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल. चौकशीअंती तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल तसेच चौकशी चालू असताना सध्या असलेल्या पदामुळे चौकशी प्रभावित होत असेल तर त्यांना सध्याच्या पदावरुन दूर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
धनंजय मुंडे यांनी 289 अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडण्यास परवानगी मागितली होती. वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी आर्थिक व्यवहारासंबंधी फोनवर केलेल्या संभाषणाची सीडी त्यांनी यावेळी सभागृहात सादर केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
अजित पवार यांनी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आणि मध्यस्थी यांच्यातील ऑडीओ क्लीपमधील संभाषण वाचून दाखविले. तसेच त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
राधेश्याम मोपलवार यांच्यासंदर्भातील क्लीपमधील आवाजाबाबत फॉरेन्सिक चौकशी करून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी बोलताना मोपलवार यांच्यावर कारवाईची मागणी केली.