मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबई,1 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये स्थानिकांना नियमानुसार रोजगार दिला नसल्यास त्याची माहिती घेऊन सखोल चौकशी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये स्थानिकांना रोजगार व उपचार मिळणेबाबत प्रश्न सदस्य सुभाष पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमत्र्यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील उपप्रश्न उपस्थित केला होता.
हॉस्पीटलसाठी जे भूखंड सवलतीच्या दराने देण्यात येतात त्यांना १५ टक्के सवलतींच्या जागांचा नियम लागू आहे आणि हॉस्पीटलने या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी यंत्रणाही कार्यान्वित आहे. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर २३ मधील भूखंड क्रमांक १३ (१४७८३.९६ चौ.मी.) हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, अपोलो हॉस्पीटलचा भूखंड हा तेथील किंमतीपेक्षा ३00 पटीने जास्त किंमत ठेवून लिलाव पद्धतीने देण्यात आला होता. त्यामुळे हॉस्पीटलने वाढीव खाटा देणे आणि सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा देणे कायद्यानुसार बंधनकारक नाही. असे असले तरी जीवनदायी योजनांचा लाभ रूग्णांना घेता येणार आहे. याशिवाय या रुग्णालयात स्थानिकांना रोजगार दिला गेला आहे किंवा नाही, याची चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,कौशल्य विकासचे प्रशिक्षण देऊ आणि स्थानिकांना रोजगार देऊ असे हॉस्पीटलच्या संचालकांनी घोषीत केले होते. मात्र तसे घडले नसल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.