मीरा भाईंदर, 29 जुलै 2017:
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे निरीक्षक सरचिटणीस व मीरा भाईंदर महानपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते डॉ.आसिफ शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला हा मोठा झटका मानला जात आहे.
आसिफ शेख हे सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सर्वसामान्यांचा विकास हा दृष्टीकोन ठेवून भाजपच्या माध्यमातून जनहिताची कामे केली जातात. ‘सबका साथ, सबका विकास,’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य नजरेसमोर ठेवून देशात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास होत आहे. भाजपच्या या विचारसरणीला अनुकूल असेच डॉ. शेख यांचे काम आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाच्या प्रयत्नात डॉ.आसिफ शेख यांची साथ लाभल्यास अधिक व्यापक काम करता येईल,अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली.
या प्रवेश सोहळ्याला खासदार कपील पाटील, आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील,महापौर गीता जैन,हसमुख गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.