नवी मुंबई, 21 जुलै 2017/AV News Bureau:
उलवे नोडमध्ये वीजपुरवठा करणारी केबल तुटल्यामुळे मागील १८ तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा रात्री आठ पंचवीसच्या सुमारास पुन्हा सुरळीत झाला. दिवसभर वीज पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. मात्र वीजपुरवठी सुरळीत झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वासः सोडला.
सीबीडी येथील महापालिका मुख्यालयाजवळ असणा-या उड्डाणपूलाखाली पावासामुळे पाणी साचले होते. याठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. शुक्रवारी पहाटे अज्ञात इसमांनी या खड्यातले पाणी जाण्यासाठी जेसीबीने मार्ग काढण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र यामुळे महावितरणची मोठी केबल तुटली गेली. त्याचा परिणाम शुक्रवारी पहाटे अडीच वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होती. आज संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा न झाल्यामुळे उलवे आणि आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले. वीज पुरवठा खंडीत झाल्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली होती.
दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत झालेल्या केबलच्या ठिकाणी जावून दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र बिघाड मोठा असल्यामुळे तो दुरूस्ती करण्यासाठी बराच वेळ गेला. अखेर रात्री दुरूस्तीचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर रात्री ८.२५ च्या सुमारास वीज पुरवठा पुन्हा सुरू झाल्याची माहिती महावितरणचे अधिकारी मुरकुटे यांनी दिली.