ठाणे, 17 जुलै 2017/AV News Bureau:
प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शहापुर, खरवलीच्या सरपंच, ग्रामसेवकाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने 17 जुलै रोजी रंगेहाथ पकडले. सरपंच यशवंत सोनु वाघ (40 वर्षे) आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे (34 वर्ष) अशी लाच मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र शहापुर, खरवलीचे सरपंच यशवंत सोनु वाघ आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे या दोघांनी तक्रारदाराकडे काम करण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपच प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज सापळा रचून सरपंच यशवंत सोनु वाघ आणि ग्रामसेवक रमेश माधव सासे या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उप अधिक्षक अंजली आंधळे यांनी दिली.