तरघर रेल्वे स्थानकासाठी निविदा मागवल्या
नवी मुंबई, 16 जुलै 2017/ AV News Breau:
नेरूळ- खारकोपर या 8 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी गेल्या आठवड्यात रूळांची चाचणी घेण्यात आली. या रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्थानक असणाऱ्या तरघर स्थानकाच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर 2017 पर्यंत हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.
- नेरुळ-उरण रेल्वे मार्ग
नेरूळ- उरण रेल्वेमार्ग या 27 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या 8 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांच्या उभारणीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचवेळी तरघर या रेल्वे स्थानकाचीही उभारणी करण्यात येणार आहे. तरघर हे रेल्वे स्थानक प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारे महत्वाचे स्थानक मानले जात आहे. त्यामुळे या स्थानकाच्या उभारणीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त नेरूळ आणि जुईनगर स्थानकांच्या धर्तीवर बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांबाहेर व्यापारी पद्धतीचे गाळे बांधले जाणार असल्याचीही माहितीही सिडकोच्या सूत्रांनी दिली.
- जमीन अधिग्रहणाची अडचण
खारकोपर ते उरण या रेल्वेमार्गासाठी जमीनीबाबत अडचणी आहेत. या मार्गावरील काही जमीन ही वन आणि खासगी मालकिची जमीन आहे. वन जमीनीच्या बाबत पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, सध्या रायगड जिल्ह्यात मोडणाऱ्या उरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. उलवे, द्रोणागिरी आदी भागात खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून निवासी संकूले उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे भविष्यात नेरुळ-उरण मार्ग अतिशय महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नेरुळ-उरण रेल्वेमार्ग केव्हा सुरू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.