आसाम, १३ जुलै २०१७/AV News Bureau:
आसामध्ये सध्या पूर परिस्थिती कमालीची गंभीर बनली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीला मोठा पूर आला आहे. ब्रम्हपुत्रा धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याचा २४ जिल्ह्यातील सुमारे १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे. या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आले. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरू असलेल्या बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे पावणे तीन हजारपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पूरामध्ये आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्री एस. सोनोवाल यांची राज्यातील सर्वाधिक प्रभावीत अशा मजुली भागाचा दौरा करून नागरिकांशी चर्चा केली. पूरामुळे विस्थापित झालेल्यांना तात्पुरता निवारा म्हणून सरकारने 294 तंबू उभारले आहेत.
दरम्यान, आसामसह अरुणाचल प्रदेश, मणिपूर आदी राज्यांनाही पुराचा मोठा फटका बसला असून शेतमालासह मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू हेदेखील आज आसामचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर पूर्व राज्यांमध्ये आलेल्या पुराचा नागरिकांना फटका बसल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत देईल, असे आश्वासन दिले.