नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांची मागणी
सायन-पनवेल महामार्गावरील निकृष्ठ डांबरीकरणामुळे अपघातांची शक्यता
नवी मुंबई, 6 जुलै 2017/AV News Bureau:
सायन-पनवेल महामार्गावर केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या डांबरीकरणामुळे उरण फाट्याजवळ प्राणांतिक अपघात होवून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आज एका लेखी निवेदनाद्वारे नेरुळ पोलिसांकडे केली आहे.
सायन-पनवेल महामार्गाचे (रस्त्याचे) डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असल्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. मंगळवारी (4 जुलै) सकाळी उरण फाटा येथे अनेक वाहने घसरून झालेल्या भिषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सायन पनवेल महामार्गाचे मोठ्या प्रमाणात डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्यात खड्डे दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते तसेच शासकीय निकष धाब्यावर बसवून कंत्राटदाराने उड्डाणपूलावर निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरणाचे काम केल्यामुळे रस्ता अतिशय गुळगुळीत झाला आहे. त्याचा परिणाम वाहने या गुळगुळीत रस्त्यावरून घसरू लागली आहेत. गेल्या 34 दिवसांमध्ये सुमारे 43 वाहने या गुळगुळीत डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून घसरून अनेक वाहनचालकांना मार लागल्याचे समोर आल्याचे रवींद्र सावंत यांनी या निवेदनात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच एसटीच्या एका चालकानेदेखील अशाप्रकारची तक्रार एसटी महामंडळाकडे करून वाहनचालकांना या रस्त्यावर सावधगिरीने वाहने चालविण्याचा मेसेजच व्हॉट्सअपवर पाठवला आहे. यावरून सायन-पनवेल महामार्ग वाहनांसाठी धोकादायक ठरू लागल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.
सध्या पावसाचेही दिवस आहेत. आधीच निकृष्ठ डांबरीकरणामुळे गुळगुळीत झालेला रस्ता पावसात अधिक धोकादायक झाला आहे. त्याचा परिणाम रोज धावणाऱ्या वाहनांसाठी हा महामार्ग कर्दनकाळ ठरू लागला आहे. त्यामुळे जोपर्यंत सायन-पनवेल महामार्गाच्या निकृष्ठ डांबरीकरणाचे काम दुरूस्त केले जात नाही, तोपर्यंत प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत तसेच वाहतूक पोलिसांना वाहन चालकांच्या मदतीसाठी तैनात करावे, अशी मागणी रवींद्र सावंत यांनी नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांच्याकडे केली आहे. यावेळी ज्ञानेश्वर गावडे, कुमार यादव, रवी पुजारी, आगलावे, नंदू गायकवाड, सुमित लंबे आणि गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.