नवी मुंबई,3 जुलै 2017/AV News Bureau:
बांधकाम परवानगीसाठी नवी मुंबई महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाची विकास परवानगी रद्द करण्यात आली आहे.
कोपरखैरणे नोडमधील सेक्टर 11 येथे गावठांण विस्तार योजना भूखंड क्रमांक 35+61 वरील तळमजला अधिक चार मजल्याच्या निवासी वापरासाठीच्या बांधकामासाठी परवानगी मिळणेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे सिडकोमार्फत कळविण्यात आल्याने व बनावट कागदपत्रे सादर करणेबाबतचा गुन्हा सिडकोमार्फत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने विकासक रमाकांत बामा पाटील यांना या बांधकामासाठी देण्यात आलेली बांधकाम परवानगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने रद्द केल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.
बांधकाम परवानगीसाठी रमाकांत पाटील यांनी सादर केलेली भाडेपट्टा करार, त्रिपक्षीय करार अशी कागदपत्रे बनावट असल्याचे सिडकोमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आणुन देण्यात आले. याबाबत सिडकोमार्फत संबंधितांवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. ही दाखल करण्यात आला. हे बनावट कागदपत्रे सादर करून त्यांनी सिडकोची व महानगरपालिकेचीही दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 51 (1) अन्वये तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 258 अन्वये बांधकाम परवानगी (प्रारंभ प्रमाणपत्रासह) रद्द करण्यात आली आहे. याबाबत संबंधितांची महानगरपालिकेनेही सुनावणीही घेतली होती व विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूद क्रमांक 8.6 नुसार सुनावणी आदेश बजाविण्यात आल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.