नवी मुंबई,3 जुलै 2017/AV News Bureau:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुनःस्थापन धोरणांतर्गत पर्यायी भूखंडांचे वाटपपत्रे वितरीत करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन पनवेल येथील मेट्रो सेंटर 1, सिडको समाज मंदिर सभागृहाच्या दुसऱ्या मजळ्यावर या कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील 9 गावांमधील जमिन अधिसूचित करण्यात आली आहे. या संदर्भात प्रकल्पबाधितांना द्यावयाच्या पर्यायी जागेसंदर्भातील सोडती यापूर्वीच काढण्यात आल्या आहेत. या क्षेत्रातील सर्व प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुनःस्थापन धोरणांतर्गत पर्यायी भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे विशेष मोहिमेंतर्गत 5 ते 18 जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे.
कॅम्पचे वेळापत्रक व तपशील खालीलप्रमाणे –
- आत्तापर्यंत 1,506 वाटपपत्रे संबंधित प्रकल्पबाधितांना वितरीत करण्यात आलेली आहेत. मूळ पॅकेजमधील जे 944 बांधकामधारक अद्याप वाटपपत्रे घेऊन गेलेले नाहीत व संचालक मंडळाने मंजूर केलेल्या सुधारीत लाभानुसार (शून्य पात्रता, पती-पत्नी व एकापेक्षा जास्त असलेले बांधकाम, 700 चौ.मी.क्षा जास्तीचे क्षेत्र व गोठा) देय असलेले 418 असे एकंदर 1362 वाटपत्रे सदर विशेष कॅम्पच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत.
- संबंधित बांधकामधारकांची दोन आठवड्यामध्ये वितरीत करायची दोन टप्प्यातील यादी, अध्यक्ष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित व पुनर्वसनबाधित दहा गावं संघर्ष समिती व संबंधित ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे देण्यात आलेली आहे. उर्वरित पात्र बांधकामधारकांना देय असलेले निवाडे/आदेश तथा वाटपपत्रे टप्प्याटप्प्याने सदर कॅम्पमार्फत वितरीत करण्यात येणार आहेत.