पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्वाळा
मुंबई,30 जून 2017/AV News Bureau:
पुनर्वसित माळीण (ता. आंबेगाव) गावातील घरांचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (सी.ओ.इ.पी.)कडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात आले आहे. यामध्ये घरांचे कोणतेही नुकसान वा घरांना तडे जाण्याची घटना घडल्याचे आढळून आले नाही. काही ठिकाणी माती वाहून जाणे, रस्ता खचणे, ड्रेनेज व गटारीचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आल्याची माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
30 जुलै 2014 रोजी मौजे माळीण या दुर्गम व आदिवासी गावात अतिवृष्टी होऊन गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 151 व्यक्ती दरडीखाली सापडून मृत्यमुखी पडल्या होत्या. माळीण गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी जिओग्राफीकल सर्व्हे ऑफ इंडिया (जी.एस.आय.) मार्फत केलेल्या सर्वेक्षणातून व ग्रामस्थांच्या मागणीनुसार मौजे आमडे येथील जागेची निवड करण्यात आली. सर्व्हे नं.45 मधील 8 एकर जागा खरेदी करण्यात आली. तसेच विविध तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने व मार्गदर्शनाने पुनर्वसित गावाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी.ओ.इ.पी. यांची त्रयस्त पक्ष (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्यात आली. पुनर्वसित माळीण गावात विविध पायाभुत सुविधा देण्यात आल्या. माळीण गावच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी 15 कोटी 14 लाख 50 हजार रुपये खर्च झाले आहेत. माळीण पुनर्वसित गावठाणातील कायमस्वरुपी घरांचे व पायाभुत सुविधांचे 2 एप्रिल 2017 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.मात्र 24 व 25 जून 2017 रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पुनर्वसित गावठाणामध्ये माती वाहून जाणे, काही ठिकाणी रस्ता खचणे, तसेच पावसामुळे गावठाणामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होणे आदी समस्या निर्माण झालेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच तालुका स्तरावरील समिती मधील अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. झालेल्या पावसामुळे गावातील काही ठिकाणी रस्ता खचलेला, काही ठिकाणी ड्रेनेज व गटारीचे नुकसान झालेले, काही घरांच्या पायऱ्याखालील माती खचल्याचे निदर्शनास आले. याबाबत तातडीने संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कार्यवाही सुरु करण्यात आली. नवीन गावातील घरांचे सी.ओ.इ.पी. कडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात आले असून घरांचे कोणतेही नुकसान वा घरांना तडे जाण्याची घटना घडली नसून काही घरांमध्ये ओलावा आल्याचे दिसून आले. स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत तातडीने सर्व कार्यवाही सुरु करण्यात आली असून सदर कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांची समिती नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व सी.ओ.ई.पी. यांच्या पहाणीनुसार नवीन गावठाणातील घरांच्या लेआऊटला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती, घराचे वॉटर प्रुफींग, गॅबीयन बंधारे आदी कामे प्रकल्पाच्या ठेकेदारांकडून आवश्यक ती दुरुस्तीची कामे करुन घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.