नवी मुंबई, 29 जून 2017/AV News Bureau:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणा-या इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 3 विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वीच्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 43 घणसोली येथील रितेश बिरुदेव वाघमोडे ( 69.33 टक्के), अनुप संजय देसाई या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 31, कौपरखैरणेच्या विद्यार्थ्याने 64.66 टक्के गुण संपादन करून आणि सानिका कैलास गुंडाकर या त्याच शाळेच्या विद्यार्थिनीने 64 टक्के गुण संपादन करून राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
26 फेब्रुवारी 2017 मध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 424 शाळांमधील इयत्ता 5 वी चा वर्ग असलेल्या 253 शाळांमधून 3465 विद्यार्थी व इयत्ता 8 वी चा वर्ग असलेल्या 215 शाळांमधून 2830 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतील 62 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत घवघवीत यश मिळविले आहे. त्यामध्ये 3 विद्यार्थी नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील आहेत.