साळाव रेवदंडा पुलाची भेग खडीने भरली

पुलाच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थ साशंक

बोर्ली-मांडला(मुरुड), 22 जून 2017/AV News Bureau

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील साळाव-रेवदंडा खाडी पुलाला भेग  पडल्याचे  निदर्शनास आल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डांबरमिश्रित खडीने भेग बुजवली आहे. मात्र  तात्पुरत्या स्वरूपात केलेली ही मलमपट्टी धोक्याची असून ऐन पावसाळ्यात एखादी दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता स्थानिक विचारू लागले आहेत. या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग,मुरुड आणि रोहा तालुक्याना जवळ आणणाऱ्या साळाव-रेवदंडा खाडी पुलाला  १७ जून २०१७ रोजी मोठी भेग पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत वृत्त अविरत वाटचाल न्यूजने प्रसिद्ध केले होते.  आता डांबरमिश्रित खडीने पूलावरील भेगा बुजविण्यात आल्या आहेत. मात्र अशाप्रकारच्या तात्पुरत्या मलमपट्टीमुळे पुलाची सुरक्षिता वाढली आहे का?  तसेच वाहतुकीसाठी पूल मजबूत झाला आहे का, असे प्रश्न  ग्रामस्थ विचारू लागले आहेत.

या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक पुलावरून होत असल्याने तसेच पुलाखालून रोहा तालुक्यातील सानेगाव येथे असणाऱ्या इंडो एनर्जी जेट्टीवर जाणाऱ्या कोळशाच्या बार्जेसनी तीन चार वेळा धडक मारल्याने हा पूल कमकुवत झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच या पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

साळाव रेवदंडा खाडीपुलाला दोन जोडणी भागात पडलेली भेग ही डांबरमिश्रित खडीने बुजविण्यात आलेली आहे. त्या पुलाची पाहणीसुद्धा आमच्या अभियंत्यांनी केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच त्याच्यावर योग्य निर्णय घेता येईल.त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन, प्रादेशिक वाहन विभागाचे अधिकारी आणि जे एस डब्ल्यू कंपनीला या पुलावरून कंपनीची होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.

– विनायक पाटील,विभागीय अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग ,अलिबाग रायगड

 

अविरत वाटचालने 19 जून 2017 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

रायगडमधील कुंडलिका खाडीवरील पुलाला भेग
https://goo.gl/nNzVei

av news follow ifle