पावडर फेकणाऱ्या तरुणाला सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले
मुंबई, 20 जून 2017/AV News Bureau:
एका तरुणाने धावत्या लोकलवर मिरची पावडर फेकल्याचा खळबळजनक प्रकार आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास शहाड रेल्वे स्थानकात घडला. या पावडरच्या संपर्कात आल्यामुळे शरीराला खाज तसेच जळजळ वाटू लागल्यामुळे 7 प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने मिरची पावडर फेकणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकलमध्ये बसण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून मिरची पावडर फेकल्याचे त्या व्यक्तीने कबूल केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
मुंबई सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल शहाड स्थानकातील प्लॅटफर्म क्रमांक 2 वर आली असता एका अज्ञात व्यक्तीने लाल रंगाची पावडर सेकंड क्लास डब्याच्या एका खिडकीवर फेकली. या पावडरमुळे अनेक प्रवाशांच्या अंगाला खाज सुटली तसेच डोळ्यांमध्ये जळजळू लागल्यामुळे सुमारे सात प्रवाशांना कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टारांनी त्यांना तातडीने डोंबिवलीतील शास्रीनगर रुग्णालयात जाण्यास सांगितले. तेथे त्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान दीपक गावडे (27) या तरुणाच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. कसारा येथील रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शहाड रेल्वे स्थानकाबाहेरील फळ विक्रेत्यांना दाखविले. विक्रेत्यांनी त्या पावडर फेकणाऱ्या तरुणाला ओळखले. त्याचा घरचा पत्ता मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्या तरुणाने आपल्या कृत्याची कबुली दिली असून लोकमधील जागेवरून काही लोकांशी आपला वाद झाला होता. त्या रागातून आपण मिरचीची पावडर फेकल्याचे त्याने रेल्वे पोलिसांना सांगितले.