जुलै महिन्यात पर्जन्यवृक्षांवर औषधाची फवारणी
स्वप्ना हरळकर/ AV News Breau:
मागील दोन वर्षांपासून नवी मुंबईतले पर्जन्यवृक्ष सुकू लागले आहेत. शहरातील जवळपास 100 हून अधिक झाडांना मिलिबग किड्याची लागण झाली आहे. यामुळे मरणपंथाला चाललेल्या या झाडांना वाचवण्यासाठी अखेर पालिकेने पुढाकार घेतला आहे. या किड्याची वाढ थांबविण्यासाठी जुलै महिन्यात या झाडांवर औषध फवारणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दोन वर्षांपूर्वी पालिकेने याबाबत दापोली कोकण कृषी विद्यापीठाला अहवाल देण्यास सांगितले होते त्यानुसार दापोली कोकण कृषी विद्यापीठातून प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार शहरातील पर्जनवृक्ष मिलिबग या किड्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मिलिबगची लागण झाल्यामुळे झाडे सुकली आहेत. या किड्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पावसाळ्यात झाडांवर फवारणी करण्यात येणार आहे. ऐरोली येथील माइंड स्पेस बिझनेस पार्क या कंपनीमध्ये मिलिबग झालेल्या झाडांवर औषध फवारणी करून ती झाडं वाचवण्यात यश आलं असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे त्यांच्या उद्यान अधिका-यांशी चर्चा करून याबाबत सल्ला घेतला जात आहे. यासाठी साधारण 4 ते 5 लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त तुषार पवार यांनी दिली.
नवी मुंबई शहराचे वातावरण उष्ण आणि ओलसर आहे त्यामुळे या वातावरणात मिलिबगची वाढ जोमाने होते. झाडांना पोखरण्याचे काम हे किडे करतात. या किड्याची लागण झाल्यावर पहिल्यांदा झाडाची पानं गळतात मग फांद्या तुटून पडतात. कालांतराने संपूर्ण झाडचं पोखरले जाते. लागण झालेल्या अशा अनेक झाडांना वाचविण्याची आता आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले.
- पर्जन्यवृक्षांचे महत्व
या झाडांचे मूळ अमेरिका आणि ब्राझील आहे. दिर्घकाळ टिकणाऱ्या या झाडांचे आयुर्मान सुमारे ६० ते ७० वर्षे इतके असते. विस्तिर्ण वाढणारी ही झाडे मृदूसंधारणासाठी उपयुक्त ठरतात. वातावरणात पसरणाऱ्या धुलीकणांना अटकाव करण्याचे कामही ही झाडे करतात.
- मिलिबगचा उपद्रव
विशिष्ठ प्रकारचे मिलिबगचे किडे झाडाच्या कोवळ्या पालवीला चिकटून बसतात. या किड्यांची संख्या लाखो असते. त्यामुळे एकदा का एखाद्या झाडाचा ताबा घेतला की, ते हळूहळू खोडापर्यंत पोहोचतात. कालांतराने झाडांची पाने गळून पडतात. त्याचा परिणाम झाडाची अन्न निर्मितीची प्रक्रियाच बंद पडून झाडे काही दिवसांतच सुकून जातात.