मिरची, जिरे, हळद, बडीशेपला विक्रमी मागणी
भारतीय मसाल्यांची निर्यात वाढणार
नवी दिल्ली, 16 जून 2017:
भारतातील मसाल्यांची चव काही न्यारीच आहे. म्हणूनच या मसाल्यांचा घमघमाट शोधत इंग्रज भारतात आले आणि दिडशे वर्षे राज्य करून गेले. भारतीय मसाल्यांच्या या घमघमाटाने जगभरातील देशांना आजही वेड लावले आहे. यंदा केवळ मसाल्यांचीच निर्यात 12 टक्क्यांनी वाढली आहे. मसाला निर्यातीमधून देशाला तब्बल 17 हजार 664 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
संपूर्ण जगभरामधील देशांनी अन्न सुरक्षा नियम अधिक कडक केले असले तरीही भारतीय मसाल्यांना बाहेरच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. भारताने 2016-17 मध्ये 17 हजार 664.61 कोटी रुपयांचे 9 लाख 47 हजार 790 टन मसाले निर्यात केले आहेत.
- तिखट मिरची सगळ्यांना हवी
भारतात उत्पादित होणाऱ्या मिरचीला अनेक देशांकडून मोठी मागणी आहे. 2015-16 मध्ये भारताने 8 लाख 43 हजार 255 टन मिरची निर्यात केली. या मिरचीची किंमत 16हजार 238.23 कोटी रुपये (2482.83 दशलक्ष अमेरिकी डॉलर) आहे. मिरचीच्या निर्यातीमध्ये यावर्षी 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- जीरे दुसऱ्या क्रमांकावर
मिरचीच्या खालोखाल भारतातील जिऱ्याला मोठी मागणी आहे. 2016-17 मध्ये भारताने 1लाख19 हजार 000 टन जिरे निर्यात केले. या जिऱ्याची किंमत 1923.20 कोटी रुपये आहे. यंदा जिऱ्याच्या किंमतीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
- हळदीसाठी औषध कंपन्या उत्सुक
जागतिक बाजारपेठेत “औषधी” म्हणून वापरण्यासाठी भारतीय हळदीला प्रचंड मागणी आहे. भारतीय हळदीचा वापर परदेशातल्या वेगवेगळ्या औषध कंपन्या करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हळदीची मागणी नोंदवली जात आहे. 2016-17 मध्ये 1,16,500 टन हळद भारताने निर्यात केली.
दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा भारतीय बडीशेप यंदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली. बडीशेपेच्या निर्यातीमध्ये 129 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याचबरोबर लसूण, जायफळ यांना असलेल्या मागणीमध्येही सातत्याने वाढ होत असल्यामुळे त्यांच्या निर्यातीतही वाढ होत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.