1050 चित्रपटगृहांमध्ये अद्याप प्रेक्षकांना खेचतोय
मुंबई, 16 जून 2017:
भारतीय चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान प्राप्त केलेला बाहुबली 2 चे आकर्षण कमी होताना दिसत नाही. सलग 50 दिवस चित्रपटगृहांमध्ये स्थिरावलेल्या या चित्रपटाची मोहिनी अद्याप संपलेली नाही. त्यामुळेच तब्बल 1050 चित्रपटगृहांमध्ये बाहुबली 2 प्रेक्षंकाना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवत आहे. भारतात धुमाकूळ घातल्यानंतर बाहुबली 2 चीनला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात बाहुबली2 चीनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते. आमिर खानच्या दंगलने तिथे आधीच विक्रमांचे झेंडे रोवले आहेत. त्यामुळे बाहुबली 2 ला चीनमध्ये कसा प्रतिसाद मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागणार आहे.
- चीनसाठी बाहुबली 2 सज्ज
28 एप्रिल रोजी देशभरातील 8 हजार 500 चित्रपटगृहांमध्ये बाहुबली प्रदर्शित झाला आणि हा हा म्हणता सारे विक्रम या चित्रपटाने आपल्या नावावर केले. भारताबाहेर इतर देशांमध्येही बाहुबली 2 चा बोलबाला आहे. आता चीनमध्ये बाहुबली 2 चे कसे स्वागत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. चित्रपट समिक्षक रमेश बाला यांच्यामते चीनमधील सुमारे 4 हजार चित्रपटगृहांमध्ये बाहुबली 2 दाखविला जाणार आहे. दंगल चित्रपटाच्या तुलनेत कमी स्क्रीन्स मिळाल्यामुळे बाहुबली 2 चे प्रदर्शन काहीसे मर्यादीत राहण्याची शक्यता वर्तविली आहे. चीनव्यतिरिक्त बाहुबली 2 आता जपान, कोरिया आणि तैवानमध्येही प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये दंगलचे वितरण करणाऱ्या ई स्टार कंपनीकडेच बाहुबली 2 चे वितरणाची जबाबदारी आहे. त्यामुळे दंगलप्रमाणे बाहुबली 2 लाही चीनमध्ये चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चित्रपटाचे कलाकार, निर्माते प्रयत्नशील आहे.