मुंबई,10 जून 2017/AV News Bureau:
राज्यात आता पावसाला सुरूवात झाली आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होतो. पावसाळ्यात वीज यंत्रणेवर झाड कोसळणे, फांद्या तुटून पडणे, पाणी तुंबून भूमिगत वाहिनी तसेच फिडर पिलरमध्ये शिरणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे, विजेच्या तारांचे घर्षण, विजेचे खांब, तारा, रोहित्रांमध्ये (ट्रान्सफॉर्मर) ठिणग्या पडून होणाऱ्या बिघाडामुळे अनेक दुर्घटना घडतात. यामध्ये नागरिकांच्या जिवितालाही धोका पोहोचण्याची भिती असते. हे संभाव्य धोके लक्षात घेऊन पावसाळ्यात नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि एखादी घटना घडल्यास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
या घटकांमुळे दुर्घटना घडू शकतात
- अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या विजेच्या तारा, खांब, फिडर पिलर, रोहित्रांवरीख लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, घरातील ओलसर उपकरणे, शेती पंपावरील स्वीचबोर्डकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडू शकतात. नागरिकांनी लोंबकळणाऱ्या तारांना हात लावू नये. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नये किंवा दुचाकी टेकवून ठेवू नये. विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी आतापासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी.
- भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते, यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. पाऊस सुरू झाला की, या वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वाहिनीत बिघाड होतो. पाणी शिरल्याने वाहिनीत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो. तसेच झाडे आणि वीज कोसळल्याने वीजपुरवठा खंडित होतो. काही वेळेस शॉर्टसर्किट होऊ शकते. परिणामी, जीवितहानी होण्याचाही संभव असतो. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
- ट्रान्सफॉर्मर, फिडर फिलर किंवा खांबावर शॉर्टसर्किट झाल्यावर त्याठिकाणी नागरिकांनी जावू नये. तात्काळ महावितरण विभागाला कळवावे. याकारता नागरिकांनी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाचा तसेच तेथील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मोबाईल क्रमांक घेऊन ठेवावा. शहरातील सोसायट्या, वस्ती भागात वायर, तारा उघड्या नसतील याची खात्री करून घ्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सतर्कतेमुळे भविष्यात उद्भवणारी दुर्घटना टळू शकते. त्यामुळे नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.
- महावितरणचे आपत्कालीन संपर्क क्रमांक
शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 1800-200-3435 किंवा 1800-233-3536 या टोल फ्री क्रमांकावर सपर्क साधावा, असे आवाहन ही महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाने केले आहे.
अशी काळजी घ्या
- मेन स्वीचमध्ये फ्यूज वायर असावी.
- घर किंवा इमारतीच्या मेन स्वीचमध्ये किंवा त्याच्या शेजारी असलेल्या किटक्याटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याएवजी अॅल्युमिनियम अलॉय या विशिष्ट धातूची तार वापरावी.अशी फ्यूज वायर वीज भारानुसार वापरल्यास शॉकसर्किट झाल्यास वीज पुरवठा आपोआप खंडित होतो.
- पाणी हे विद्युत वाहक असल्याने वीज उपकरणांना पाणी लागू देऊ नका.
- वीज उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवावीत.
- विद्युतउपकरणावर पाणी पडल्यास ते उपकरणा तात्काळ बंद करून ते मूळ वीज जोडणी पासून तात्काळ दूर करावे.
- विद्युत उपकरणे खिडकी तसेच बाल्कनी पासून दूर ठेवावीत.
- मीटर जवळ पाणी झिरपत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा व लगेचच महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी.
- लोखंडी तारेवर कपडे वाळत घालू नये. तसेच ही तार वीज खांबाला अथवा वीज यंत्रणेला बांधू नये.
- ओल्या कपड्यावर इस्त्री फिरवू नका. तसेच ओलसर हातानी विद्युत उपकरणे हाताळू नये.
- विजेच्या खांबाजवळ खेळू नका. विजेच्या तारांखाली ज्वलनशील पदार्थ ठेवू नका.
- अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून घरातील वीज यंत्रणांची तपासणी करून घ्या.
- वीज अपघात रोखण्यात आर्थिंग महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे घरातील वीज यंत्रणेचे आर्थिंग तपासून घ्यावे.